WhatsApp


Love Triangle Tragedy:- भयंकर प्रेमत्रिकोणाची शोकांतिका: आईची हत्या व वडिलांची आत्महत्या; एकाच कुटुंबावर काळाचा घाला

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ११ एप्रिल २०२५ :- जिल्ह्यातील गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेला द्वेष इतका विक्राळ रूप धारण करेल, याची कल्पना कोणालाही आली नसती. यात एक आई मृत्यूमुखी पडली असून, पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केली. या प्रकरणात एक तिसरा व्यक्ती, ज्याच्याशी संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तो या सर्व घडामोडींमागे जबाबदार ठरतोय, अशी तक्रार फिर्यादीने दाखल केली आहे.

रोशन गौतम वर (वय २७ वर्षे), व्यवसायाने हॉटेल चालक, सध्या पंचशील नगर वाशीम येथे वास्तव्यास आहेत. मूळचे ते ग्राम पिंपरी खरबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम येथील रहिवासी आहेत. रोशन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आई – ज्योती वर आणि आरोपी संजय लक्ष्मण ठोके (रा. नवीन सोनखस, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) यांच्यात अनैतिक संबंध होते.

या संबंधांमुळे घरात तणाव निर्माण झाला होता. संजय ठोके याने रोशनचे वडील – शंकर ठाकरे यांना वारंवार धमक्या दिल्या होत्या. “तु ज्योतीला फारकत दे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे,” असे म्हणत त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या सततच्या त्रासामुळे आणि मानसिक दबावामुळेच ही शोकांतिका घडल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०:०० च्या सुमारास ते १० एप्रिलच्या सकाळी ७:०० वाजेपर्यंतच्या कालावधीत, रोशन यांच्या आई ज्योती यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी धारदार विळा व लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले गेले. त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर, घराच्या जवळच असलेल्या शंकर ठाकरे यांच्या शेतामधील पत्राशेडमध्ये, त्यांनी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर, रोशन गौतम वर यांनी आरोपी संजय लक्ष्मण ठोके याच्या विरोधात मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी IPC अंतर्गत कलम १०३(१), १०८, ३५१(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. श्री. अनुज तारे (पोलीस अधीक्षक, वाशीम), श्रीमती लता फड (अप्पर पोलीस अधीक्षक) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती निलीमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर आडे हे करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!