अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ९ एप्रिल २०२५:- राज्यातील सर्वाधिक चर्चेत आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी ठरत आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची अधिकृत माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतून महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
प्रारंभी महायुतीकडून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात सद्यस्थितीत दरमहा 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. तरीही ही रक्कम ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे.
एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार?
गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांना प्रश्न पडला होता की, यंदा एप्रिलचा हप्ता वेळेवर मिळणार का? लाभार्थींची संख्या वाढणार की कमी होणार, याबाबतही संभ्रम होता. मात्र आता खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, “एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे”.

अक्षय्य तृतीया हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते. त्यामुळे राज्य सरकारने हा हप्ता याच दिवशी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला या योजनेअंतर्गत लाखो महिलांनी नोंदणी केली होती. मात्र दर महिन्याला हप्ता मिळण्याच्या प्रक्रियेत काही वेळा अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले. त्याच वेळी अनेक नव्या महिलांनीही अर्ज केले.
मात्र अद्याप सरकारकडून याबाबत स्पष्ट माहिती आलेली नाही की, यंदाच्या एप्रिल महिन्यात लाभार्थींची संख्या नेमकी किती आहे. तरीही हप्ता नियमित मिळत असल्यामुळे योजना अजूनही लोकप्रिय असल्याचे स्पष्ट होते. सरकारकडून आता या प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी ऑनलाइन अर्ज आणि अधिक पारदर्शक यंत्रणा तयार केली जात आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने येणारा हा हप्ता महिलांसाठी एक प्रकारचं आर्थिक आशीर्वाद ठरणार आहे. महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले आर्थिक जीवन अधिक सशक्त करावे, हा सरकारचा उद्देश आहे.
