अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ७ एप्रिल २०२५ – अकोल्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास अत्याचार केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. ही घटना केवळ त्या मुलीसाठी नव्हे, तर प्रत्येक पालकाच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे.
ही घटना रात्री साधारण दोन वाजताच्या सुमारास घडली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीकडे अकोल्यात आली होती. रात्री उशिरा ती आपल्या दुसऱ्या अल्पवयीन मैत्रिणीसोबत अकोला रेल्वे स्टेशन चौकात उभी होती. त्याचवेळी एक 25 वर्षीय अनोळखी तरुण दुचाकीवर तेथे आला आणि पीडित मुलीला सोबत घेऊन गेला. संशयित तरुणाने तिला शहरातील अकोट फैल भागात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला. अत्याचारानंतर त्याने पीडित मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडले.

ही घटना उघडकीस येताच अकोल्यात एकच खळबळ उडाली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी या घटनेची पुष्टी करत सांगितले की, “आरोपीचे ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस प्रत्येक दिशेने तपास करत आहेत.”या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या भागात रात्री दोन वाजता दोन अल्पवयीन मुली उभ्या असणं, आणि त्याच ठिकाणी एक तरुण त्यापैकी एक मुलीला घेऊन जातो, यावरुन पोलीस गस्त व्यवस्था किती ढासळलेली आहे हे स्पष्ट दिसून येते. पोलीस गस्त, सीसीटीव्ही नियंत्रण आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासनाला मोठा धडा देणारी ही घटना आहे.या घटनेनंतर पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुली बाहेर कशा काय फिरत होत्या? त्यांच्या पालकांनी खबरदारी का घेतली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मात्र या प्रश्नांमधूनच आपल्या समाजातील बेजबाबदारपणाचं प्रतिबिंबही स्पष्टपणे दिसून येतं.तसेच, आरोपी तरुणाने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला पुन्हा स्टेशन चौकात सोडणं ही बाबही गंभीर आहे. अशा धाडसाला कारणीभूत ठरणारी पोलीस यंत्रणेची हलगर्जीपणाही यामध्ये स्पष्टपणे दिसून येते.या घटनेनंतर नागरिकांनी मागणी केली आहे की, स्टेशन परिसर आणि शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये २४ तास महिला सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त ठेवावी. तसेच सीसीटीव्हींची संख्या वाढवून त्यांच्या देखरेखीची जबाबदारी ठराविक अधिकाऱ्यांकडे देण्यात यावी.

पोलिसांनी अधिक दक्षता घेऊन अशा प्रकारचे प्रकार रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत.या गंभीर घटनेमुळे अकोल्यातील सर्वसामान्य नागरिक, महिलावर्ग, पालकवर्ग अत्यंत चिंतेत आहेत. पोलिसांनी आरोपीचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.