अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सत्तासंघर्षाने निर्णायक वळण घेतले आहे. राजराजेश्वर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्यात राजकीय वातावरण तापले असून, भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट मैदानात उतरणार आहेत. रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणारी ही सभा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात चुरस वाढत असताना, या महाप्रचार सभेकडे सत्तेच्या शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी ही सभा महत्त्वाची मानली जात असून, राज्यातील आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अकोल्याच्या राजकीय इतिहासात ही सभा महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती म्हणजे भाजप–राष्ट्रवादी आघाडीचा आत्मविश्वास आणि विजयाचा दावा मानला जात असून, विरोधकांसाठीही ही सभा मोठे आव्हान ठरणार आहे.

दरम्यान, अकोला क्रिकेट मैदानावर भव्य व्यासपीठ, ध्वनिव्यवस्था, सुरक्षेची चोख तयारी, तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीसाठी नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. या सभेमुळे अकोल्यातील निवडणूक प्रचाराला नवी धार मिळणार असून, सत्तेचा शंखनाद याच मैदानावर होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
