WhatsApp


Wild Animal Attack :-धक्कादायक घटना लांडग्याचा हल्ला: ६२ वर्षीय महिला गंभीर जखमी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १एप्रिल २०२५:-आलेगाव वनविभागांतर्गत येणाऱ्या दिग्रस बु गावात सोमवार, पहाटेच्या सुमारास ६२ वर्षीय महिलेला लांडग्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम दिग्रस येथील सुवर्णा भगवान इंगळे (वय ६२) या पहाटेच्या सुमारास शेतात मजुरीसाठी जात होत्या. त्या वेळी अचानक एका लांडग्याने त्यांच्यावर मागच्या बाजूने हल्ला चढवला. सुवर्णा इंगळे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र लांडग्याने त्यांचे दोन्ही हात जोरात चावा घेतला. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या असून एका बोटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उपचाराची स्थिती

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा इंगळे यांना तत्काळ वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्या असून तब्बल ४९ टाके घालावे लागले आहेत.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेनंतर दिग्रस बु गावातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. लांडग्याचा हल्ला अचानक आणि अनपेक्षित असल्याने शेतात जाणाऱ्या मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांनी वनविभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांची मागणी

सुवर्णा इंगळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वनविभागाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाने या भागात लांडग्यांचा वावर रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.लांडग्याच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!