अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३१मार्च २०२५:- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल ४१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल १६५ किलो अंमली पदार्थ अकोला पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत नष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जप्त केलेल्या गांजा, अफू, चरस, एमडी यांसारख्या अंमली पदार्थांची सुरक्षा व साठवणूक करण्यासाठी अकोला पोलीस मुख्यालयात विशेष गोदाम तयार करण्यात आले.
पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अकोला जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कठोर भूमिका घेत पोलिसांनी १९८५ च्या एनडीपीएस कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल केले. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी प्रलंबित अंमली पदार्थ मुद्देमालाचा आढावा घेत त्याच्या विल्हेवाटीच्या सूचना दिल्या. त्यानुसार, न्यायालयाची परवानगी घेऊन ४१ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
कायदेशीर प्रक्रिया व नियोजनबद्ध नष्टिकरण
अंमली पदार्थ विल्हेवाटीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयाची तसेच दिल्लीतील जीओएएफच्या मुख्य नियंत्रकांची परवानगी घेण्यात आली. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ येथे हा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी पाठवण्यात आला.
विशेष समितीच्या देखरेखीखाली नष्टिकरण
४१ गुन्ह्यातील १६५ किलो १२० ग्रॅम अंमली पदार्थ ‘रोटरी ईन्सिनरेटर’मध्ये जाळून नष्ट करण्याची प्रक्रिया विशेष समितीच्या देखरेखीखाली पार पडली. या वेळी अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, दोन शासकीय पंच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी महेश भिवापुरकर आणि कंपनीचे युनिट हेड प्रशांत मस्के उपस्थित होते.
अकोला पोलिसांची अंमली पदार्थविरोधी मोहिम तीव्र
अकोला पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवली असून, जिल्ह्यात अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके आणि गुप्तचर विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
जनतेसह पोलिसांचे आवाहन
अंमली पदार्थविरोधी लढ्यासाठी पोलिसांनी जनतेला सहकार्याची विनंती केली आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कठोर कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या या पावलामुळे अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसण्याची शक्यता आहे.