अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २९ मार्च २०२५:-अडगाव बु. (पो. स्टे. हिवरखेड) येथील आगामी रमजान ईद आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत विशेष रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये हिवरखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रशासन, होमगार्ड, आणि विविध समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला. हा मार्च अडगाव बु. येथील मुख्य मार्गांवरुन काढण्यात आला. त्यात घाना चौक, गांधी चौक, राम मंदिर, मानकरपुरा, गजानन महाराज मंदिर, काळा मारुती मंदिर, कुरेशीपुरा मशीद आणि घाना चौक या मार्गांचा समावेश होता.
रूट मार्चदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना शांतता व बंधुभाव टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा गैरप्रकारांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पोलीस प्रशासनाने स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून आगामी सण उत्साहाने, पण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.

या रूट मार्चमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या उपाययोजनांचे कौतुक होत आहे. रमजान ईद आणि रामनवमी हे दोन्ही सण धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे या काळात विशेष दक्षता घेणे आवश्यक असते. त्यामुळे प्रशासनाने आधीच योग्य त्या उपाययोजना राबवून नागरिकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष गस्त घालण्यात येईल तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणी नजर ठेवली जाईल. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या रूट मार्चमुळे अडगाव बु. व परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव झाली असून, आगामी सण आनंदाने व शांततेत साजरे करण्याचा संदेश देण्यात आला आहे. प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला असून, यामुळे धार्मिक सौहार्द अधिक दृढ होण्यास मदत होईल.
