अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २६ मार्च २०२५:- अकोला जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह ठरणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस च्या टीमने वेळीच हस्तक्षेप करत हा बालविवाह रोखला. समाजासाठी हे एक मोठे यश ठरले असून, या मोहिमेत स्थानिक प्रशासन, बालकल्याण समिती, पोलिस, ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गुप्त माहिती आणि त्वरित कारवाई
गावात एका १७ वर्षीय मुलीचे लग्न ठरल्याची माहिती मिळताच ॲसेस टु जस्टीस प्रकल्पाच्या टीमने तत्काळ मुलीच्या घरी भेट दिली. चौकशीअंती मुलीच्या आजीकडून समजले की, मुलीच्या वडिलांचे निधन चार वर्षांपूर्वी झाले होते आणि आईने दुसरे लग्न केल्याने मुलीचे संगोपन आजीकडेच होते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे आणि भविष्यात मुलीला आधार मिळावा म्हणून आजीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
टीमने आजीशी संवाद साधून बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती दिली. कायद्याने १८ वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करणे गुन्हा आहे, हे स्पष्ट केल्यानंतर आजीने आपला निर्णय बदलण्यास सहमती दर्शवली.
बालकल्याण समितीचा हस्तक्षेप आणि हमीपत्र
प्रकरण गंभीर असल्याने मुलीला बालकल्याण समिती, अकोला यांच्यासमोर हजर करण्यात आले. समितीने आजीकडून मुलीचे १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे हमीपत्र लिहून घेतले. यावेळी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आणि पोलिसांनीही उपस्थित राहून जबाबदारी घेतली.
सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका
या संपूर्ण मोहिमेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बालकल्याण समिती अकोला, तसेच ॲसेस टु जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, विशाल गजभिये, कम्युनिटी सोशल वर्कर पूजा पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एका निष्पाप मुलीचे बालविवाहापासून रक्षण झाले.
समाजासाठी महत्त्वाचा संदेश
ही घटना केवळ एक प्रकरण नसून, संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे. आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या भविष्यासोबत तडजोड करणे चुकीचे आहे. शिक्षण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणे आवश्यक आहे.
‘ॲसेस टु जस्टीस’ प्रकल्पाच्या टीमचे हे कार्य कौतुकास्पद असून, समाजात बालविवाह रोखण्यासाठी अशीच जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे!