अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २२ मार्च २०२५:- मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपली, की उन्हाळी सुट्टीला लागली की थेट मामाच्या गावाला! हेच गणित प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते. मात्र, यावर्षी हे चित्र बदलणार आहे. कारण शिक्षण विभागाने नुकताच नवीन शासन निर्णय (जीआर) जारी करत पहिली ते नववीच्या परीक्षा 5 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांची सुट्टीवरची स्वप्ने धुळीस मिळाली असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
मे महिन्यात गर्दीचा फटका
सामान्यतः परीक्षा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपतात, त्यामुळे एप्रिलच्या मध्यापासूनच गावाला जाण्याचा प्लॅन ठरतो. मात्र यंदा परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबवण्यात आल्याने हजारो कुटुंबांचे उन्हाळी पर्यटन आणि गावच्या भेटीचे नियोजन बिघडणार आहे. परिणामी, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून, रेल्वे आणि एसटीच्या तिकीटांचे आधीच आरक्षण फुल होत आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांचा संताप
या निर्णयामुळे मुलांचा हिरमोड झाला असून, पालकही नाराज आहेत. आधीच उन्हाच्या तीव्रतेमुळे एप्रिलमध्ये परीक्षा देणे अवघड होते, त्यात आता संपूर्ण एप्रिल परीक्षेतच जाणार असल्याने उन्हाळी सुट्टीचा आनंद नाहीसा होईल, असे अनेक पालक सांगतात.
सरकारी निर्णयावर टीका
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करत, उन्हाळ्यात परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात आक्षेप घेतला आहे. काहींनी तर थेट सरकारकडे परीक्षा वेळापत्रक पुन्हा सुधारण्याची मागणी केली आहे.
गर्दी आणि प्रवास समस्येचे संकट
मे महिन्यात रेल्वे, बस आणि विमानतळांवर होणाऱ्या गर्दीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागेल. विशेषतः गावी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी नाकीनऊ येणार आहे. आधीच अनेक रेल्वेगाड्यांची आरक्षणे हाऊसफुल्ल झाली असून, खाजगी ट्रॅव्हल्सने भाडे वाढवण्यास सुरुवात केली आहे.
शिक्षण खात्याने वेळीच दखल घ्यावी!
शिक्षण विभागाने या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद हिरावणाऱ्या या निर्णयावर लवकरच तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.