अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २१मार्च २०२५:-महाकुंभ पर्वातील पवित्र तीर्थ जल आता महाराष्ट्राच्या घरोघरी! अनुलोम संस्थेच्या पुढाकाराने प्रयागराज कुंभातील पवित्र जल कलशाच्या माध्यमातून कंचनपुर येथे आणण्यात आले. भाविकांनी श्रद्धेने पूजन करत महायात्रेचा आनंद घेतला
“मकरसंक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत प्रयागराज येथे संपन्न झालेल्या भव्य महाकुंभ मेळ्यात देश-विदेशातील लाखो भाविकांनी संगमस्नानाचा लाभ घेतला. मात्र, अनेक भक्तांना या पवित्र कुंभस्नानाचा लाभ घेता आला नाही. याच भावनांचा सन्मान राखत अनुलोम या सामाजिक संस्थेने प्रयागराज येथील पवित्र तीर्थ जल महाराष्ट्रातील विविध भागात पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

याच अनुषंगाने बाळापूर विधानसभेचे भाग जनसेवक आदित्य तायडे यांच्या पुढाकाराने कंचनपुर येथे भव्य तीर्थ कलश दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील यांनी केले. गावातील विवाहित जोडप्यांनी पवित्र तीर्थ कलशाचे पूजन केले.
यावेळी कंजरा, ता. मूर्तिजापूर येथील टाळकरी महिला व कंचनपूर गावातील वारकरी ग्रुपने सोहळ्यात भक्तिरस भरला. ग्रामस्थांनी उत्साहात कलशाची दिंडी काढली, घराघरांमध्ये रांगोळ्या काढून स्वागत केले. पंचक्रोशीतील साधुसंत आणि भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांसह अनुलोमचे सहकारी मित्र व उपविभाग श्री दिलीप मोरे,बळवंत गावंडे,प्रवीण मोरे,शारदा मोरे व गावकरी उपस्थित होते.
गावभर टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य दिंडी सोहळा निघाला. श्रद्धेचा, भक्तीचा आणि सामाजिक एकतेचा हा अनोखा सोहळा कंचनपुरच्या भूमीवर भक्तिरसाचा आनंद देऊन संपन्न झाला.