अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २१ मार्च २०२५:-महाराष्ट्रावर हवामानाचं दुहेरी संकट कोसळण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात तापमान प्रचंड वाढत असताना, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हे मोठं आव्हान ठरणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
गारपीट आणि मुसळधार पावसाचा अलर्ट
हवामान खात्यानुसार, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज (21 मार्च) गारपीट होण्याची शक्यता आहे. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.
तर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी बरसतील. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या 14 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वारे यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. विशेषतः गहू, हरभरा, आंबा आणि फळबागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं पीक सुरक्षित ठिकाणी साठवावं, असे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, असंही प्रशासनाने सूचित केलं आहे.
उष्णतेची लाट आणि बदलतं हवामान
दुसरीकडे, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि काही मराठवाड्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. उष्णतेची लाट जाणवत असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस कसे असतील?
हवामान विभागानुसार, 22 आणि 23 मार्च रोजीही काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावं आणि सुरक्षितता बाळगावी.
सावध राहा, सुरक्षित राहा!
महाराष्ट्रात हवामानाचं मोठं परिवर्तन होत असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि हवामानाशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती वेळोवेळी तपासावी.