भाजपच्या प्रचाराला जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा

Spread the love

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचाराची रणनिती अधिक आक्रमक करत मोठी ताकद मैदानात उतरवली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ जानेवारी रोजी अकोल्यात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा क्रिकेट क्लब मैदान अकोला येथे पार पडणार असून, या सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिका निवडणूक निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना भाजपकडून वरिष्ठ नेतृत्व थेट प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, प्रचाराला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे चित्र आहे.

या सभेत मुख्यमंत्री फडणवीस अकोला शहरातील विकासकामे, डबल इंजिन सरकारचा अजेंडा, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडणार आहेत. तसेच महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास अकोल्याच्या विकासासाठी कोणती दिशा दिली जाईल, याचे स्पष्ट संकेतही या सभेतून दिले जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडून या प्रचार सभेची जोरदार तयारी सुरू असून, शहर व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर खेडकर भवन परिसरात तयारीला वेग आला असून, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य नियोजन करण्यात येत आहे.

एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे अकोला महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अधिकच तापणार असून, राजकीय समीकरणांवर या सभेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!