नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सजत असतानाच अकोल्यात रक्ताचे डाग उमटले. क्षुल्लक वादातून उसळलेली हिंसा थेट एका युवकाच्या जीवावर बेतली आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर हादरवून टाकणारी ही घटना समोर आली.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सजत असतानाच अकोल्यातील कृषी नगर परिसरात एक धक्कादायक आणि हळहळजनक घटना घडली आहे. तंबाखू मागण्याच्या किरकोळ वादातून एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत संतोष भगवंतराव घावडे (वय अंदाजे ४१, रा. कृषी नगर, अकोला) यांचा मृत्यू झाला असून आरोपी राम गिराम (वय २८) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास संतोष घावडे आणि राम गिराम यांच्यात तंबाखूच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच हाणामारीत बदलला. वादाच्या भरात आरोपी राम गिराम याने संतोष घावडे याच्या डोक्यावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संतोष यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
युवकाच्या अकाली मृत्यूची माहिती पसरताच कृषी नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अकोला शहरात शोककळा पसरली असून, किरकोळ वादातून थेट हत्येपर्यंत गेलेली ही घटना सामाजिक शांततेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.










