अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ४ मार्च २०२५:- अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात नवसाळजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एलएनजी टँकरमधून गॅस गळती झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
मुर्तीजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवसाळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एका एलएनजी टँकरमधून गॅस गळती झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी कुरूम, माना तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स तसेच माना आणि कुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरत सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही गॅस गळतीमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे.
स्थानिक नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, गॅस गळती थांबवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. प्रशासनाच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.