अकोला न्यूज नेटवक ब्यूरो दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ चंचल पितांबरवाले अकोट :- आकोट न्यायालय परिसरात जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. २) यांचे न्यायदान कक्षाबाहेर जोरात बोलून न्यायालयाची शांतता भंग केल्याप्रकरणी संजय आठवले यांना आकोट न्यायालयाने एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची हकीगत अशी कि, आकोट न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी राहुल शिंदे हे गत पंधरा दिवसांपूर्वीच बदलून आलेले आहेत. त्यांचा कक्ष हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच आहे. त्यामुळे न्यायालयात येणारा जाणाऱ्यांची त्या ठिकाणी बरीच वर्दळ असते. परिणामी त्या ठिकाणी जाता येता लोकांची आपसात चर्चा सुरू असते. या चर्चेमुळे न्यायदानाचे वेळी न्यायालय कक्षात मोठा व्यत्यय निर्माण होतो. तसाच व्यत्यय न्यायाधीश राहुल शिंदे यांना आल्या दिवसापासूनच होत होता.
त्याबाबत त्यांनी संबंधित सुरक्षारक्षकांना बरेचदा तासलेही आहे. परंतु न्यायालयात रोज नवनवीन लोक येत असल्याने त्या लोकांना शांतता राखण्याची सूचना करता करता सुरक्षारक्षकांचीही तारांबळ सुरू राहते. अशा स्थितीत संजय आठवले व त्यांचे मित्र चंद्रशेखर बारब्दे हे दोघेही न्यायालयीन कामानिमित्त आपल्या वकिलांना भेटण्याकरिता आकोट न्यायालयात गेले होते. त्यावेळी नेमक्या त्याच कक्षाजवळ हे दोघेही तिथे भेटलेल्या आपल्या मित्रांशी बोलत होते. संयोगाने त्याच वेळी न्यायदान कक्षात एका प्रकरणी निकाल पत्राचे लिखाण सुरू होते.
त्यावेळी न्यायदान कक्षाबाहेर आपल्या मित्रांशी बोलताना संजय आठवले यांचा आवाज अनवधानाने चढला. परंतु त्या आवाजाने न्यायदान कक्षात निकाल पत्राचा मजकूर सांगताना न्यायाधीशांना व्यत्यय आला. त्याने न्यायाधीशांचा पारा चढला. आणि आवाज चढविणाऱ्याला आपल्यासमोर हजर करण्याचे फर्मान त्यांनी सुरक्षारक्षकाला सोडले. त्यानुसार संजय आठवले यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल शिंदे यांचे समक्ष हजर करण्यात आले. संतापलेल्या न्यायाधीशांनी संजय आठवले यांना न्यायालयासमोर बसण्यास सांगितले.
त्यानंतर न्यायाधीशांनी संजय आठवले यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याची संधी दिली. त्यावेळी संजय आठवले यांनी आपली बाजू मांडून झाल्या प्रकाराबाबत न्यायालयाची क्षमायाचना केली. त्यांचे वर्तनाबाबत न्यायालयात उपस्थित अनेक वकिलांनीही चांगली साक्ष दिली. त्या सर्व बाबींचा अनुकूल परिणाम होऊन न्यायाधीशांनी एक हजार रुपये दंड ठोठावला. आणि संजय आठवले यांना घरी जाण्यास मुभा दिली. या साऱ्या प्रकरणातून धडा घेऊन न्यायालयात यापुढे लोक शांतता राखतील असा आशावाद अनेक वकिलांनी बोलून दाखविला.