अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २७ फेब्रुवारी २०२५:-दहीहंडा पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मध्यरात्री धडक कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २५ फेब्रुवारीच्या रात्रीपासून २६ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत सुरू होती. यात एक टाटा ९०९ (एम एच ३० एबी ०४८२) वाहन अकोट पोलिसांनी अडवले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरटी रेती आढळली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
अवैध रेती वाहतुकीविरोधात तक्रारी वाढत असताना, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर चोरटी रेती वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे दहीहंडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार परी. किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईट पेट्रोलिंग पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन जउळखेड येथे नाकाबंदी केली.
पहाटे ४ वाजताच्या सुमारास चोहोट्टा बाजार दिशेकडून संशयित टाटा ९०९ वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे एक ब्रास अवैध रेती सापडली, ज्याची बाजारातील किंमत ४,००० रुपये एवढी होती.
वाहन चालक आणि मालक ताब्यात
या कारवाईत वाहन चालक शुभम सुभाष ओईंबे (वय ३०, रा. किनखेड, ता. अकोट, जि. अकोला) आणि वाहन मालक प्रविण दयाराम ओईंबे (वय ३४, रा. किनखेड) यांना पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत, या वाहनाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, पोलिसांनी टाटा ९०९ गाडी (३,००,०००) आणि रेती (४,०००) असे एकूण ३,०४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अवैध खनिज वाहतुकीसाठी जबाबदार असलेल्या दोघांविरोधात गौण खनिज कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
महसूल विभागाची भूमिका संशयास्पद?
अवैध रेती तस्करीसाठी महसूल विभागाच्या निष्क्रियतेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच जिल्ह्यात अवैध खनिज वाहतूक बिनधास्त सुरू असल्याचे बोलले जात आहे. महसूल विभागाने जर योग्य पद्धतीने रेती घाटांवर नियंत्रण ठेवले असते, तर अशा घटनांना आळा बसला असता.
पोलीस प्रशासनाचा इशारा: अवैध वाहतूक थांबवा!
या कारवाईनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध खनिज वाहतूक करणाऱ्यांना इशारा दिला आहे की, नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अशा प्रकारच्या कारवाया अजून वाढवण्याची गरज आहे.