अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २३फेब्रुवारी २०२५:– राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्यांचा दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे राज्य सरकार बस भाडे वाढवण्याचा निर्णय घेत आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर धावणाऱ्या भंगार बसेस प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. प्रवासादरम्यान अर्ध्या वाटेत बंद पडणाऱ्या बसेस, तांत्रिक बिघाड आणि पर्यायी बसेस नसल्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारी पुन्हा भंगार बस प्रवाशांच्या अडचणी वाढवते!
शनिवार सकाळी एका बसचा ब्रेक फेल झाल्याने ती बंद पडली, ही घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी पुन्हा अकोट डेपोच्या जुन्या आणि जीर्ण बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या. रविवारी अकोट डेपो येथून सुटलेली बस क्रमांक एमएच ४० क्यू बी ६४३३ दहीहंडा फाटा येथे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्याच दिवशी दुसऱ्या एका बसचा टायर पंचर झाल्याने (बस क्रमांक एमएच ४० व्हाय ५३०८) वल्लभनगर ते उगवा फाटा दरम्यान ती जागेवरच उभी ठेवावी लागली. यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.
बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल
या घटनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामासाठी निघालेल्या लोकांना उशीर होतो, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळीच केंद्रावर पोहोचणे अवघड होते आणि प्रवासादरम्यान अचानक बस बंद पडल्याने लोकांना रस्त्यावर थांबावे लागते. विशेषतः ग्रामीण भागात पर्यायी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक अजूनच त्रस्त झाले आहेत.

भाडेवाढ मात्र सुविधा सुधारत नाहीत!
राज्य परिवहन विभागाने भाडेवाढीचा निर्णय घेतल्याने प्रवाश्यांचा खर्च वाढला आहे, मात्र त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा झालेली दिसत नाही. बसेस जुने झाल्याने वारंवार बंद पडतात, प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा विश्वास राहत नाही आणि वारंवार येणाऱ्या बिघाडांमुळे वेळेचा अपव्यय होतो.
सरकारी अनास्थेमुळे वाढत्या तक्रारी
एस.टी. महामंडळाच्या या अनास्थेमुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. प्रवासी संघटनांनी अनेक वेळा प्रशासनाकडे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ‘बससेवा सुधारण्याच्या नावाखाली फक्त भाडे वाढवले जाते, मात्र जुन्या बसेसच धावत असल्याने प्रवास धोकादायक बनतो,’ अशी प्रवाशांची तक्रार आहे.

जर या समस्या लवकर सुटल्या नाहीत, तर भविष्यात प्रवाशांचा रोष अधिक वाढू शकतो आणि एस.टी. महामंडळाविरोधात मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे.