WhatsApp


बारावीची परीक्षा उद्यापासून ; एक दिवस आधी शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १० फेब्रुवारी २०२५ स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी :– उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवार दि. ११ फेब्रुवारीपासून १२ वीची परीक्षा सुरू होणार आहे. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी पातूर तालुक्यातील एकुण २ हजार ७४८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी पातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून १ व जिल्हाधिकारी, अकोला शिक्षणाधिकारी माध्यमिक, अकोला शिक्षणाधिकारी प्राथमिक, मुख्याध्यापक (डी.आय.ई.टी) प्रत्येकी एक अशाप्रकारे भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पातूर तालुक्यात एकूण १२ परीक्षा केंद्र असून ११४ नियमित व २३ अतिरिक्त अशे एकूण १३७ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील चोखपणे केली आहे, व परीक्षा सुरू असतांना विद्यूत पुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर जनरेटरची व्यवस्था करावी यासाठी पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना पत्र दिले असून पातूरचे तहसीलदार डॉ.राहुल वानखडे यांनी देखील आढावा घेतला असल्याची माहिती पातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी दिली.

सकाळच्या सत्रात ११ ते २ वाजेपर्यंत होणाऱ्या पेपरसाठी १०.३० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे.कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे.दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूह कॉपी, पेपर व्हायरल होणे असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळाने गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.परीक्षेत कॉपी करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे.या निर्णयामुळे परीक्षेत कॉपी करणे व त्यासाठी सहाय्य करणाऱ्यांवर देखील सशक्त कारवाई केल्या जाणार आहे.तसेच परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्राचे पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुख यांची जिल्ह्यातील अंतर्गत बदलीही करण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे अवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केले आहे.त्याचप्रमाणे परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रियाशोभा मेहेर (गटशिक्षणाधिकारी पातुर)

इयत्ता दहावी बारावी परीक्षा संदर्भात जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचना नुसार केंद्रप्रमुख पर्यवेक्षक यांची शाळा बदली करण्यात येत आहे कॉपीमुक्त परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी कडक नियमावली करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!