अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक ३ फेब्रुवारी २०२५:- अकोट- अकोला-नाका रेल्वे ब्रिजवर झालेल्या दुर्दैवी अपघातात 7 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रक आणि दुचाकीच्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अपघातस्थळी कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी ठिय्या मांडून ट्रक चालकाच्या अटकेची मागणी केली.
अंधारात बुडालेल्या पुलावर पुन्हा अपघात
अकोट-अकोला मार्गावरील रेल्वे पुलावर झाला. या पुलावर अद्यापही स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे हा पूल अपघातास निमंत्रण देत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक वारंवार करत आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावर सतत दुर्घटना घडत आहेत.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथून ट्रक (क्रमांक MH 27 X 7409) कुटाराने भरलेला होता. ट्रक अकोला-नाका ब्रिजवर चढत असताना, समोरून येणाऱ्या स्कुटीला जोरदार धडक बसली. या धडकेत स्कुटीवरील कु. निधी दिपक जेस्वानी (वय 7) हिला गंभीर मार लागला आणि जागेवरच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संतप्त नागरिकांचा ठिय्या
प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोपअपघाताची माहिती मिळताच, चिमुकलीच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या दिला. “जोपर्यंत ट्रक चालकाला अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही,” असा इशारा संतप्त जमावाने दिला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असून, या पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, अद्यापही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पोलीस प्रशासनाची तातडीची कारवाई
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, अकोट शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त नागरिकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि पुढील अनुचित प्रकार थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या. दरम्यान, पोलिसांनी तातडीने ट्रक चालकाला अटक केली असून, अपघातग्रस्त ट्रक पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “जर पुलावर योग्य प्रकाशव्यवस्था आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना असत्या, तर हा अपघात टाळता आला असता,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपघातानंतर स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
अकोट शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. अंधाऱ्या पुलांवर प्रकाश योजना नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात असे आणखी अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे निधीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, हा अपघात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील.