WhatsApp


लाभार्थ्यांची व्यथा – ‘आम्हाला आमचे हक्काचे धान्य मिळणार की नाही?’पातूरमध्ये रेशन दुकानदाराचा उर्मटपणा; शासकीय आदेशाला हरताळ,

Share

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक १फेब्रुवारी २०२५,स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी :- स्वस्त धान्य दुकानातून गरीब आणि गरजू नागरिकांना वेळेवर रेशन मिळावे, यासाठी सरकार अनेक योजना राबवते. मात्र, पातूर शहरातील काही दुकानदार शासनाच्या या आदेशांना हरताळ फासत असून गरजू लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. कढोणे वाडी येथील शासकीय रेशन दुकान परवानाधारक महादेव जयराम मानकर यांच्या दुकानात नागरिकांना धान्य देण्यास टाळाटाळ केली जात असून, त्यांचा मुलगा स्वप्निल मानकर हा लाभार्थ्यांशी उद्धटपणे वागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

लाभार्थ्यांना मिळतेय अपमानास्पद वागणूक

सदर रेशन दुकानात येणाऱ्या लाभार्थ्यांना रेशनबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. लाभार्थ्यांनी प्रश्न विचारले, तर त्यांना उलट धाक दाखवला जातो. 1 फेब्रुवारी 2025 रोजी काही नागरिक जानेवारी महिन्याचे रेशन घेण्यासाठी गेले असता, स्वप्निल मानकरने त्यांना धान्य देण्यास नकार दिला. शासनाने जानेवारी महिन्यासाठी 1 आणि 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असतानाही, ‘तारीख संपली, साठा नाही’ असे सांगत त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले.

शासनाच्या निर्णयाची पायमल्ली

तपासणीदरम्यान, संबंधित दुकानात मुबलक धान्यसाठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. स्थानिक पत्रकारांनी या साठ्याचे फोटो काढले असता, दुकानदाराने उर्मटपणे ‘कुठेही तक्रार करा, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही’ असे विधान केले. त्यामुळे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे या दुकानदारास अभय आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

पुरवठा विभागाकडे तक्रारींची दखल नाही

गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांकडून स्वस्त धान्य दुकानाच्या गैरकारभाराबाबत पातूर तहसील पुरवठा विभागाकडे तक्रारी दाखल आहेत. मात्र, या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे संबंधित अधिकारी आणि रेशन दुकानदार यांच्यात मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लाभार्थ्यांची व्यथा – ‘आम्हाला आमचे हक्काचे धान्य मिळणार की नाही?’

गावातील अनेक गरजू कुटुंबे या रेशन दुकानावर अवलंबून आहेत. पण दुकानदाराच्या मनमानीमुळे त्यांना आपल्या हक्काचे धान्य मिळत नाही. सरकारने गरीब आणि गरजूंना मदत म्हणून रेशन योजना लागू केली, मात्र त्या योजनांचा गैरफायदा घेत लोकांना वेठीस धरले जात आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कठोर पावले उचलावीत

गोरगरीब जनतेला वेठीस धरून शासनाच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या या रेशन दुकानदारावर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

आज झालेल्या घटनेमुळे संबंधित रेशन दुकानदार परवानाधारक यांनी लाभार्थ्यांच्या हक्काचे रेशन देण्यास टाळाटाळ केली व शासन निर्णयाच्या मुदतवाढी बाबत माहिती लपवून त्यांना वंचित ठेवले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मात्र सदर प्रकरणी पातूर पुरवठा विभागीय अंतर्गत जर कोणत्याही लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत असेल तर मी स्वतः जातीने तपास करून उचित कारवाई करेल. – शितल मोरखडे (पुरवठा निरीक्षण अधिकारी,पातूर)

Leave a Comment

error: Content is protected !!