अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १९ जानेवारी २०२५ :- सन २०२५ मध्ये अकोला जिल्ह्यातील पहिला धोकादायक गुन्हेगार म्हणून शेख कादर उर्फ सलमान शेख आमद कुरेशी (वय २३) याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. अब्दुल्ला कॉलनी, खदान, अकोला येथे राहणाऱ्या या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी कारवाई करण्यात आली आहे.
शेख कादरवर खुनाच्या प्रयत्नापासून चोरी, जनावरांची निर्दय हत्या, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि शांततेचा भंग करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याचा परिणाम होऊ शकला नाही. कायद्याचा वारंवार भंग करून तो अकोल्यातील शांततेसाठी धोका निर्माण करीत होता.
या परिस्थितीत, अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शेख कादरविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुन्हेगाराविषयीची सविस्तर माहिती व पुरावे तपासून त्याला धोकादायक घोषित केले. दि. १८ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला एका वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सैरिसे, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने शेख कादरला अटक करून कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
अकोला जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व मनपा निवडणुका तसेच सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला. शांतता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.
शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाची ही कार्यवाही अकोल्यातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.