अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ६ जानेवारी २०२५ :- HMPV : कोविड-19 महामारीच्या पाच वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एका नवीन विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) नावाचा हा विषाणू आता भारतातही पोहोचला आहे.
बंगळुरूतील 8 महिन्याच्या एका बालकाला या विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले असून, भारत सरकारने तत्काळ सतर्कता जाहीर केली आहे.
आता बाधितांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तीन चिमुकल्यांना एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाला आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे दोन चिमुकल्यांना बाधा झाल्यावर आता गुजरातमध्ये सुद्धा एक रुग्ण आढळून आला आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एचएमपीव्ही विषाणूचा (Human Metapneumovirus) संसर्ग एका चिमुकल्याला झाल्याची माहिती समोर आली आहे. एका दोन वर्षांच्या मुलाला एचएमपीव्हीची बाधा झाली आहे. या मुलावर अहमदाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीमध्ये आरोग्य विभाग सतर्क
दिल्लीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. वंदना बग्गा यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत श्वसन रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चर्चा झाली. रुग्णालयांना ILI (इन्फ्लूएंझासदृश आजार) आणि SRI (गंभीर तीव्र श्वसन संक्रमण) यासंदर्भातील त्वरित माहिती IHIP पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपचार आणि खबरदारी
संशयित रुग्णांसाठी कडक विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यात आले असून, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन, पॅरासिटामॉल, अँटीहिस्टामाइन्स, ब्रोन्कोडायलेटर, आणि कफ सिरप यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
HMPV म्हणजे काय ?
ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक श्वसन विषाणू असून, त्याची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लूसारखी असतात. सामान्यतः घसा खवखवणे, खोकला, नाक वाहणे यांसारखी लक्षणे दिसतात. लहान मुले, वृद्ध, तसेच कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये हा विषाणू गंभीर आजार घडवतो.
HMPV आणि कोविड-19 यामध्ये साम्य काय?
एचएमपीव्ही आणि कोविड-19 हे वेगळ्या व्हायरल कुटुंबातील असले तरी, दोघेही मानवी श्वसन प्रणालीला लक्ष्य करतात. दोन्ही विषाणू श्वसन थेंबांद्वारे आणि दूषित पृष्ठभागांच्या संपर्काने पसरतात. ताप, खोकला, घसा खवखवणे, आणि श्वास लागणे ही दोन्ही विषाणूंची समान लक्षणे आहेत.
सतर्कतेचा इशारा
चीनमधील श्वसन आजारांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातही आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर असून, सध्याच्या स्थितीत श्वसन आजारांमध्ये कोणतीही मोठी वाढ झालेली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे.