WhatsApp


पातूर पोलिसांच्या तत्परतेने मायलेकांची पुन्हा भेट, गतीमंद असलेला मुलगा आपल्या सुखरूप घरी

Share

ANN & GTPL न्युज नेटवर्क, अकोलाप्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे दि. १ जानेवारी २०२५ पातूर : पातूर येथील “रेणुका माता मंदिर टेकडीजवळ सापडलेल्या गतीमंद मुलाला आज आईच्या ताब्यात देण्यात आले. पातूर पोलिस आणि बालकल्याण समिती तात्काळ ऍक्शन मोडवर आल्यामुळे हा मुलगा सुखरूप घरी पोहोचला.

दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी रेणुका माता मंदिर टेकडीजवळ एक गतीमंद मुलगा सापडल्याची माहिती पातूर पोलीसांना मिळाली असता सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा मुलगा फक्त उमेश नाव असल्याचे सांगत असल्याने पोलिसांना हा नेमका कोण व कुठला आहे याचा तपास लावणे कठीण झाले होते. सदर मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सहा. पो. उपनिरीक्षक अरविंद पवार व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पातोंड यांनी त्याला बालकल्याण समिती, अकोला यांच्याकडे दाखल केले.

पातूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सदर मुलाच्या ओळखीचा तपास सुरू केला. पातूर पोलीस स्टेशन येथील सिसिटीएनएस चे कामकाज पाहणाऱ्या सोनाली राठोड यांच्या सहकार्याने पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पातोंड यांनी मुलाच्या आईचा फोन नंबर प्राप्त करून माहिती मिळवली शोध घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला गेला.

आज, बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली, गतीमंद मुलाला त्याच्या आई सुरेखा रवींद्र भोसले, राहणार आरेगाव, पोस्ट डोणगाव, यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस आणि बालकल्याण समितीच्या समन्वयामुळे हा मुलगा सुखरूप घरी परतला. हा प्रकरण हा कुटुंबाच्या आनंदाचा आणि पोलिसांच्या तत्परतेचा आदर्श ठरला आहे.

सदर घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुलाची योग्य काळजी घेतल्याबद्दल आणि त्याला आईकडे पोहोचवल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!