ANN & GTPL न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी स्वप्निल सुरवाडे पातूर दि. 10 डिसेंबर 2024 :– दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च पालिकेच्या घनकचरा विभागावर केला जातो. मात्र, एवढा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही पातूर शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही.
शहरातील रस्त्यांवर तसेच चौकाचौकांमध्ये असलेल्या कचराकुंड्या नगर परिषद प्रशासनाने काढून टाकल्या. घरोघरी तयार होणारा कचरा गोळा करण्यासाठी ‘स्वामी सर्व्हिसेस’ या खाजगी संस्थेला काम देऊन त्यांच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली. या संस्थेच्या कामगारांनी गोळा केलेला कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र, कचराकुंड्या काढून टाकल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर, चौकांच्या लगतच सर्रास कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. जागोजागी हा कचरा कोण टाकते, यावर नगर परिषदेच्या प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषद सहभागी होत आहे. या स्पर्धेत शहराला वरचा क्रमांक मिळावा, यासाठी दर वर्षी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात, योजना राबविल्या जातात, जनजागृती करण्यासाठी फलक लावून, वृत्तपत्रांतून जाहिराती दिल्या जातात. मात्र, उपयोग शून्य. त्यामुळे नगर परिषदेचा हा खर्च वाया जात आहे.
पातूर शहरात रोज दीड ते दोन टन कचरा तयार होतो. हा कचरा गोळा करून त्यावर भंडारज फाट्यावर असलेल्या न.प. च्या कचरा प्रकल्पांत प्रक्रिया केली जाते. शहरातील विविध भागांतून गोळा होणारा कचरा, प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्यासाठी दर वर्षी घनकचरा विभागाच्या वतीने शेकडो कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जातात.
या शिवाय शहरातील कचरा गोळा करण्यासाठी आणि कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून कचरा घंटा गाड्या खरेदी केल्या मात्र, पातूर नगर परिषदने या वाहनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘कचरा संकलन करणाऱ्या गाड्याच अक्षरशः कचऱ्यात पडून आहेत”.
त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची कमतरता पाहता कचरा पोहोचविण्यासाठी मारल्या जाणाऱ्या फेऱ्या, यातील व्यस्त प्रमाण, यामुळे संबंधित ठेकेदारांची बिले तेवढी फुगत असल्याचे चित्र आहे.