समृद्धी महामार्गावरून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या कारला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात मंत्री प्रतापराव जाधव कारमध्ये नव्हते, मात्र त्यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सुरक्षित पोहोचविल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, सहकारी आणि वाहनचालक हे तिघे मेहकरकडे परत येत असताना रात्री उशिरा समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात नेमका कसा झाला, वाहनाचा वेग जास्त होता का, की तांत्रिक बिघाड झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



