WhatsApp

सातपुड्यात शेतकऱ्याचा जीव मोलाचा नाही?वन्यहल्ल्याने पुन्हा उघडली वनविभागाची पोलखोल

Share

शेतकऱ्यांनी शेतात पिकं पिकवायची की स्वतःचा जीव वाचवायचा, असा संतप्त प्रश्न सातपुड्याच्या पायथ्याशी पुन्हा एकदा उभा राहिला आहे. वन्यप्राण्यांचे हल्ले वाढत असताना वनविभाग मात्र मूक प्रेक्षक बनून बसल्याचे विदारक चित्र शहापूर येथे समोर आले असून, एका शेतकऱ्याचा जीव थेट धोक्यात आला आहे.



अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहापूर गावात वनविभागाच्या हलगर्जीपणाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. शेतात काम करत असताना शेतकरी हुशेन सुरत्ने यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सातपुडा परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढलेला असताना, वनविभाग मात्र कागदोपत्री उपाययोजनांमध्येच अडकलेला आहे, असा संतप्त आरोप शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केला जात आहे. शेतात काम करायचं की जीव वाचवायचा, असा प्रश्न आज शहापूरसह परिसरातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

हुशेन सुरत्ने हे रोजच्या प्रमाणे शेतात काम करत असताना अचानक वन्यप्राण्याने त्यांच्यावर झडप घातली. आरडाओरड ऐकून स्थानिकांनी धाव घेतली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तोपर्यंत शेतकरी गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Watch Ad

महत्त्वाचं म्हणजे, याआधीही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. तरीही वनविभागाकडून ना ठोस गस्त, ना संरक्षणात्मक उपाय, ना शेतकऱ्यांना इशारा देण्याची यंत्रणा कार्यरत दिसत आहे.

वनविभागाला शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत नाही का?
हल्ला झाल्यावरच पंचनामा, भेटी आणि आश्वासनं देणार का?
प्रत्यक्षात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, गस्त आणि नुकसानभरपाई यावर ठोस कारवाई कधी होणार, असा थेट सवाल आता प्रशासनाला विचारला जात आहे.

या घटनेनंतर शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांकडून वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!