अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे
दि. २८ डिसेंबर २०२५ :डिसेंबरच्या शेवटाकडे जात असताना अकोला जिल्ह्यात थंडीचा प्रभाव तीव्र होत चालला आहे. दिवसेंदिवस घसरत जाणाऱ्या तापमानाने अखेर मानवी जीव घेतल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यात घडली असून, थंडीमुळे अकोला जिल्ह्यातील हा पहिला बळी ठरला आहे.
आज दि. २८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास पातूर शहरातील आठवडी बाजार परिसरातील ओट्यावर एक इसम मृत अवस्थेत पडलेला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. ही बाब समजताच परिसरात खळबळ उडाली आणि विविध चर्चांना उधाण आले.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात सदर इसमाचा मृत्यू तीव्र थंडीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत व्यक्तीच्या खिशातून सापडलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख गजानन मोतीराम खत्री, रा. चान्नी, ता. पातूर अशी पटली आहे.
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील हा पहिलाच मृत्यू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उघड्यावर राहणारे, मजूर, गरजू आणि बेघर व्यक्तींसाठी ही थंडी जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पातूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, थंडीचा जोर वाढत असताना प्रशासनाने गरजूंसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






