शिक्षण, तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या गप्पा रंगत असताना समाजाच्या तळाशी मात्र माणुसकीची घसरण वेगाने होत असल्याचे विदारक चित्र पुन्हा समोर आले आहे. संस्कार, शिस्त आणि जबाबदारी यांची कडी सैल होत चालली असताना, विकृतीने थेट बालपणावरच घाला घातल्याची घटना तालुक्यात घडली असून, संपूर्ण परिसरात संताप आणि अस्वस्थतेची लाट उसळली आहे.
तालुक्यातील एका गावात भरदिवसा दोन अल्पवयीन मुलांनी ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. घटनेमुळे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या माहेरभूमीत अशी घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, घटना दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. घरात एकटी असलेल्या मुलीकडे शेजारी राहणारे अंदाजे १४ व १५ वर्षे वयाचे दोन अल्पवयीन आले. यावेळी एका मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा बाहेर पहारा देत होता. नंतर मुलीच्या वेदनांवरून प्रकार उघडकीस आला आणि आईने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(i), ६५(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून बालसुरक्षा, पालकांची जबाबदारी, सामाजिक संस्कार आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव यावर गंभीर आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.






