गारठवणाऱ्या थंडीत शहर साखर झोपेत असताना, अचानक एक भीषण आवाज झाला… क्षणातच रस्त्यालगतच्या टपऱ्या आणि दुकाने चुरगाळली गेली. भरधाव ट्रक थेट व्यवसायिकांच्या उदरनिर्वाहावरच आदळला आणि शांत असलेला बुलढाणा रोड एका क्षणात थराराचा साक्षीदार ठरला.
मलकापूर शहरात शनिवारी उत्तररात्री भर वेगातील मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन थेट रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली. बुलढाणा राज्य मार्गावरील ही घटना पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र छोट्या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, एमएच-४०-बीसी-५६०८ क्रमांकाचा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बुलढाणा रोडवरील रस्त्याकडेला असलेल्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसला. अपघात इतका भीषण होता की हातगाड्या, टपऱ्या आणि दुकानातील साहित्य पूर्णतः उद्ध्वस्त झाले. गारठवणाऱ्या थंडीत शहर साखर झोपेत असतानाच हा थरारक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर बुलढाणा रोड परिसरातील नागरिकांनी अवजड वाहनांचा वेग आणि रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.






