अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २३ मार्च :- भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या एका उमेदवार निवडीवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साजिद खान पठाण याला उमेदवार म्हणून उभे केले आहे. साजिद पठाण यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत.
भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत साजिद पठाण यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या 16 गुन्ह्यांची यादी वाचून दाखवली. यामध्ये दंगल घडविणे, घातक शस्त्रांचा वापर करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता.
दरेकर यांनी म्हटले की, “अशा अट्टल गुन्हेगाराला उमेदवार म्हणून उभे करून काँग्रेसने जनतेवर घोर अन्याय केला आहे. गुन्हेगार उमेदवाराला उमेदवारी देऊन काँग्रेसने ‘गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा’ हे धोरण अवलंबले आहे.”
दरेकर पुढे म्हणाले, “काँग्रेसने साजिद पठाण याला उमेदवारी देऊन ‘काँग्रेस का हाथ, दंगाईयों के साथ’ हेच सिद्ध केले आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून न तुटलेला भारत जोडण्याचे नाटक करणाऱ्या काँग्रेसने उलट ‘भारत तोडो’ ची भाषा करणाऱ्यालाच उमेदवार केले आहे.”
भाजपा प्रवक्त्यांच्या मते, नफरत तोडो नव्हे तर नफरत पसरवणे हा काँग्रेसचा असली चेहरा आहे. ते गुन्हेगारांना पाठिंबा देत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करते. भाजपाने काँग्रेसला विनंती केली आहे की ती या दंगेखोराची उमेदवारी मागे घ्यावी.