अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक 9 मार्च 2024: अकोला जिल्ह्यात बनावट सिगारेटची खुलेआम विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आयटीसी कंपनीच्या बनावट सिगारेटचा साठा शहरातील विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
या प्रकरणाची माहिती कंपनीच्या वितरण विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना कल्पना दिली. त्यानुसार पोलिसांनी अकोला शहरातील किराणा मार्केटमधील भगवती ट्रेडर्स आणि उन्नती एंटरप्रायझेस या दुकानांवर छापे टाकले.
माहितीच्या आधारे कंपनीचे अधिकारी अंकुश सुरेशराव इंगळे, युवराज सिंग यांच्यासह एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे, पोलीस कर्मचारी उमेश पराये व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी किराणा मार्केटमधील भगवती ट्रेडर्स या दुकान क्रमांक 22 मध्ये छापा टाकला. या कारवाईत अधिकाऱ्यांनी दुकानात ठेवलेली २५ हजार ७५० रुपये किमतीची सिगारेटची वेगवेगळी पाकिटे जप्त केली.
कंपनीचे वितरण अधिकारी युवराजसिंग रघुबीर सिंग यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना सबजा बाजार येथील उन्नती एंटरप्रायझेस येथे छापा टाकून तेथून साडेचार हजार रुपये किमतीची बनावट सिगारेटची पाकिटे जप्त केली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 420, 63, 65, 104 अन्वये तसेच दुकान संचालक नीलेश दामोदर सदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाकर्तेपणावरही बोट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात बनावट सिगरेटची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असतानाही या विभागाकडून योग्य ते नियंत्रण गाळण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर अशा प्रकारच्या प्रकरणांमुळे गंभीर परिणाम होतील, असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.