“संभाजी ब्रिगेड लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीसह प्रचारात उतरणार – आमदार अभय पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सेवाभावी उपस्थिती”

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १५ एप्रिल :- अकोला शहरात संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. संभाजी ब्रिगेड या संस्थेचे राज्य महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी स्पष्ट केले की, देशातील लोकशाही व संविधानासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे घातक आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून त्यांच्या प्रचार अभियानात ताकदीनिशी उतरणार आहे.

या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, काँग्रेस नेते डॉ. प्रशांत वानखडे, कपिल ढोके, आकाश कवडे, कपिल रावदेव, सागर कावरे, बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा प्रभारी गणेश अंदुले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नमन आंबेकर, युवक जिल्हाध्यक्ष निखिल खानझोडे, जिल्हा सचिव हर्षल देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या या घोषणेमुळे राज्यभरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सेवाभावी प्रचारात उतरणार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचार अभियानातही ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडने चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मदत करणे सुरू केले असल्याचेही सौरभदादा खेडेकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा डॉ. अभय पाटील यांना मिळत असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करत डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारातील सक्रिय सहभाग जाहीर केला.

या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रयत्नांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठा बळ मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे

Leave a Comment

error: Content is protected !!