भरधाव टिप्परने महिलेला चिरडून मृत्यू, रस्त्यावर वाहतूक कोंडी

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १४ मार्च २०२४ :- १३ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अकोटमधील उमरा फाटा परिसरात एका भरधाव टिप्परने रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला चिरडून मृत्यूला घातल्याची घटना घडली. मृत महिलेची ओळख अंजनाबाई साहेबराव गव्हाळे (६५) अशी पटली आहे. त्या अकोट येथील रहिवासी होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनाबाई गव्हाळे या आपल्या जावई संदीप बुंदे यांच्यासोबत सिरसोली येथून उमरा फाटा येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. दरम्यान, अकोटवरून हिवरखेड जाणाऱ्या भरधाव टिप्पर क्रमांक एम.एच. ३० बीडी २४३५ ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अंजनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, उपनिरीक्षक बोडखे, उमरा बिट जमदार उमेश सोळंके यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी टिप्परचालक रमेश पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातामुळे उमरा फाटा परिसरात काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Leave a Comment

error: Content is protected !!