WhatsApp

नवनीत राणांविरोधात उमेदवार देणार बच्चू कडू मोठ्या उमेदवाराची करणार घोषणा ?

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २९ मार्च २०२४ :- भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांचा विरोध कायम असून आज दुपारी ते महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. बच्चू कडू अमरावतीमध्ये नवनीत राणांच्याविरोधात उमेदवार देणार आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.सुरूवातीपासून बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात भूमिका घेतली होती. आता भाजपकडून नवीनत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू आणि राणा दांपत्यामधील वाद सर्वश्रुत आहे. मागील काळात रवी राणांनी बच्चू कडूंवर आरोप केले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचा वचपा काढण्यासाठी बच्चू कडू तयारीत आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेत उमेदवाराची घोषणा ?
आज दुपारी बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार असून मोठ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब हे महाविकास आघाडीकडून अमरावतीमध्ये निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण मविआमध्ये काँग्रेसकडे हा मतदारसंघ गेला आणि बळवंत वानखेडे यांना उमेदवारी मिळाल्याने दिनेश बूब नाराज झाले.

त्यामुळे बच्चू कडू हे दिनेश बूब यांना प्रहारमध्ये घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी १ वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल. आणि प्रहारकडून दिनेश बूब हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, अशी माहितीही मिळाली आहे. खासदार नवनीत राणांच्या विरोधात आमदार बच्चू कडूंची ही नवी खेळी असल्याची चर्चा आहे.

बच्चू कडू यांचा कडाडून विरोध
नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही. त्यांचा प्रचार मी करणार नाही. तर त्यांचा पराभव करणार, असं बच्चू कडू काल म्हणाले होते. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही. आता तर उमेदवारी जाहीर झालीय. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आपण सगळं व्यवस्थित करू. एकतर दुसरं कुणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येतं का? किंवा दुसऱ्या एखाद्या सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येतं का? या गोष्टींचं नियोजन सुरु आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर ते नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बूब यांना उभं करणार का ? आजच्या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!