ज्यांच्यामुळे सत्ता गेली, त्यांच्याशीच युती? अकोल्यात ठाकरे–कडू राजकीय ट्विस्ट

राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच अकोल्याच्या राजकारणात अचानक मोठी उलथापालथ झाली आहे. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आज हातात हात घालताना दिसत असून, प्रहार–ठाकरे युतीने शहरातील राजकीय गणितेच बदलून टाकली आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याने, सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

अशातच अकोल्याच्या राजकारणात मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी सत्तासंघर्षात दुरावलेले हे नेते जुने वाद विसरून पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे चार उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर महापालिका निवडणूक लढवणार आहेत. प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील हे प्रभाग क्रमांक ८ मधून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असून, त्यांच्यासोबत प्रहारचे आणखी तीन उमेदवारही याच प्रभागातून मैदानात उतरणार आहेत. या युतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याआधीच ठाकरे गटाने मनसेसोबत युती जाहीर करून राजकीय गणिते बदलली होती. त्यात आता बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेची साथ मिळाल्याने, ठाकरे गटाने अकोल्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी ठोस पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. या नव्या युतीमुळे महापालिका निवडणुकीत विरोधकांसमोर थेट आव्हान उभे राहणार, हे निश्चित मानले जात आहे.

एकूणच, अकोला महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक लढत न राहता राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे. आगामी दिवसांत आणखी कोणत्या आघाड्या जुळतात आणि कोणते नवे डाव खेळले जातात, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे.

https://www.instagram.com/reel/DS18UJHDQIv/?igsh=MXYzdnV5dGdyOHQ3eA==

Leave a Comment

error: Content is protected !!