WhatsApp

Goa nightclub fire accident गोव्यात नाईट क्लबला भीषण आग! 23 जणांचा मृत्यू; सिलेंडर स्फोटाचा संशय, चौकशी सुरू

Share

गोव्यातील अर्पोरा गावात एका नाईट क्लबमध्ये काल रात्री उशिरा भीषण दुर्घटना घडली. रात्री जवळपास १२ वाजता अचानक लागलेल्या आगीत ३ महिला आणि २० पुरुषांसह एकूण २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी आणि काही पर्यटकांचाही समावेश आहे. अधिकतर मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



घटनेनंतर क्लब परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याची चर्चा असली तरी पोलिसांनी याची पुष्टी केलेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप तपासात आहे. मध्यरात्री आगीची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीची माहिती घेतली.

मुख्यमंत्री सावंत यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त केले आणि चौकशीचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की,
“ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोषी आढळणाऱ्यांना अटक केली जाईल. सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास हे गंभीर आहे.”

गोवा डीजीपी आलोक कुमार यांच्या माहितीनुसार, रात्री १२:०४ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला अर्पोरा येथील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. बचाव कार्य अनेक तास सुरू राहिले आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह बांबोलीम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.

Watch Ad

प्राथमिक तपासात समोर आले आहे की नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच त्यांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
त्यांनी पुढे सांगितले,
“पर्यटन हंगामात ही घटना अतिशय वेदनादायी आहे. आम्ही सखोल चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

भाजप आमदार मायकल लोबो यांनी सांगितले,
“२३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथक रात्रभर काम करत आहे. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.”

या घटनेनंतर गोव्यातील पर्यटन क्षेत्रात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाईट क्लब, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांच्याकडून अग्निसुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जाते याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
राज्य सरकारने आश्वासन दिले आहे की चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!