WhatsApp

बुधवारपासून आचारसंहिता लागू? नगरपालिकांच्या निवडणुका तीन टप्प्यात!पहिल्या टप्प्यात २८९ नगरपरिषदांचा समावेश, आयोगाची बुधवारी पत्रकार परिषद!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २ नोव्हेंबर २०२५ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा थरार लवकरच रंगणार आहे. राज्यातील नगरपालिकांचे प्रभाग व नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले असून मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. आता निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याचीच प्रतीक्षा आहे.



विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी होणार आहे. याच पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्या दिवशीच राज्यभर निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारीपूर्वी सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले आहे. तर महापालिकांच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षण या महिन्यात जाहीर होणार आहे.

Watch Ad

५ नोव्हेंबरला आचारसंहिता लागू झाल्यास, पहिल्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुका २१ ते २५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडतील.

राज्यातील नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुका एकूण ८५ ते ८७ दिवसांच्या कालावधीत होणार असून, सलग तीन महिने आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डेडलाईननुसार, राज्य सरकार व निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली असून, राजकीय पक्षांनीही प्रचार मोहीम जोरात सुरू केली आहे.
या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी यालाच ‘राजकीय जनतेचा ट्रायल बॅलट’ मानले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!