अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ९ डिसेंबर २०२५:विधानसभेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापले. अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे आपल्या खास आमदारासह इतर सदस्यांनाही चांगले धारेवर धरले. सतत “लाडकी बहीण” योजनेचा संदर्भ देणाऱ्यांकडे त्यांचा रोख होता. “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
घडले असे की, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला. त्यांनी सभागृहात सांगितले की, तीन बैठका झाल्या, निर्देश दिले गेले, पण कारवाई शून्य. ग्रामीण भागातील हा रोजचा त्रास आहे, तेथील महिलांचे दुःख ऐका… आणि लाडकी बहीण म्हणत अवैध दारूवर आळा घालण्याची मागणी त्यांनी केली.
यावर फडणवीसांनी तात्काळ प्रतिसाद दिला. “लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. त्या योजनांची इतर कोणत्याही मुद्द्याशी तुलना करता येत नाही. प्रत्येक विषयात लाडकी बहीण आणू नका,” असे ते संतप्त होऊन म्हणाले. त्यांचा आवाज कठोर झाला होता आणि सभागृहात काही क्षणांसाठी शांतता पसरली.
या आधी काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना सुरक्षा आणि लाडकी बहीण योजनेचा संदर्भ दिला होता. त्या वेळीही फडणवीसांनी त्यांना थांबवत “योजनेला प्रत्येक मुद्द्याशी जोडू नका,” असे स्पष्ट केले होते.
काही मिनिटांतच पवारांनीही तसाच उल्लेख केल्याने फडणवीसांचा पारा आणखी वाढला. त्यांच्या वक्तव्याने सभागृहातील राजकीय तापमान वाढले आणि चर्चेत नवीन वळण आले.





