WhatsApp

ईव्हीएमचा दिवा कुठे लागला? मतदाराचा संताप उसळला… गडचांदूरमध्ये मतदान थरार

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २डिसेंबर २०२५:चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात मंगळवारचा दिवस प्रभाग ९ साठी अक्षरशः धक्कादायक ठरला. आदर्श हिंदी विद्यालयातील केंद्र क्रमांक २ वर सायंकाळची वेळ… मतदारांची मध्यम गर्दी… आणि अचानक संपूर्ण मतदान केंद्र हादरवून टाकणारा एकच आवाज. हे सर्व कसं सुरू झालं? तर ४० वर्षांचे राम मल्लेश दुर्गे नामक मतदार मशीनसमोर उभे राहिले. त्यांना ‘नगारा’ चिन्हाला मतदान करायचं होतं. त्यांनी बटन दाबलं आणि पुढच्या क्षणी पाहतात तो काय… बाजूला असलेला ‘कमळ’ चमकत होता.



क्षणभर ते स्वतःच स्तब्ध. दोन सेकंदांनी ते पेटले. इतके पेटले की प्रचंड संतापाच्या भरात त्यांनी थेट मशीनच फोडून टाकली. प्लास्टिकचे तुकडे, वायरची ओढाओढ, कर्मचाऱ्यांचा गोंधळ… आणि पाहतापाहता मतदान केंद्रात एक छोटं वादळ उसळलं. निवडणूक हे नेहमीच तणावाचं मैदान, पण इतक्या थेट आणि एवढ्या धाडसी पद्धतीने मशीन तोडली जाते, हे राज्यात विरळच.

घटना समजण्याच्या आतच बाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. लोकांनी एकाच सुरात घोषणा देण्यास सुरुवात केली. “भाजप मुर्दाबाद”चे घोष ऐकून बाजारपेठेपासून शाळेच्या गेटपर्यंत ताण जाणवू लागला. लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न सारखेच होते – मशीन चुकली, की काहीतरी वेगळंच घडलं? काहींचे तर्क, काहींचे आरोप आणि काहींची भीती… परिस्थिती क्षणोक्षणी तापत गेली.

मतदान प्रक्रियेला अक्षरशः ब्रेक बसला. रांगेत उभे असलेले मतदार अस्वस्थ. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत कुजबुज. केंद्रातील कर्मचारी हादरलेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसताच प्रशासन हलकं झोपल्यासारखं उठलं. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह केंद्रावर झडप घातली. वातावरणात तणाव आणि संशयाचा रंग अगदी स्पष्ट दिसत होता.

Watch Ad

अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “तपास होईल… घाई करू नका… मतदान नियमाने पुढे जाईल…” अशी विनंती केली. पण नागरिकांच्या मनातील प्रश्न मोठे होते. मतदाराच्या नजरेतून पाहिलं तर; “मी ‘नगारा’ दाबलं, मग ‘कमळ’ कसा लागला?” हा एकच प्रश्न केंद्रातील वातावरणाला तापवत होता. काही नागरिकांनी थेट आरोपांची छाया टाकत परिस्थिती आणखी चिघळू दिली. काहींनी तर हा प्रकार पूर्वनियोजित असू शकतो, असंही कानाखाली सांगायला सुरुवात केली.

दरम्यान, पोलिसांनी ईव्हीएमचा पंचनामा सुरू केला. मशीन जप्त करण्यात आली. अधिकारी गंभीर. पोलिस सतर्क. बाहेरचा जमाव अजूनही वैतागलेला. “केंद्रावर काही तरी गडबड आहे” या एका वाक्याने संपूर्ण परिसरात वेगळाच तणाव पसरला. मतदानाचं महत्त्व लोकांना कळतं. पण मतदानाची साधनं जर चुकली, तर मतदारांचा विश्वास डळमळीत होणारच. हेच दृश्य केंद्राबाहेर लोकांच्या भावनांतून दिसत होतं.

यानंतर नवीन मशीन लावण्यात आलं आणि मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं. पण तणाव संपला का? अजिबात नाही. प्रत्येकाने मशीनसमोर उभं राहून दोनदा तपासलं. बटण दाबण्यापूर्वी आणि दाबल्यानंतरही मतदारांची नजर स्क्रीनवर खिळलेली होती. कर्मचारी पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करत होते. प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला. केंद्राबाहेर बंदोबस्त कडक करण्यात आल्याचं दृश्य सांगत होतं की, निवडणुकीत काहीही घडू शकतं.

या संपूर्ण प्रकरणामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण अक्षरशः उकळत्या टप्प्यावर पोहोचलं. एकीकडे मतदाराचा आरोप, दुसरीकडे मशीन फोडण्याची घटना आणि त्यातून उभा राहिलेला तणाव. कोण बरोबर? कोण चुकलं? मशीनमध्ये खरोखर तांत्रिक त्रुटी होती की काहीतरी वेगळाच खेळ होता? याचे धागेदोरे तपासातच स्पष्ट होतील.

तथापि, या घटनेमुळे एकच मुद्दा पुढे आला – मतदारांचा विश्वास डळमळू नये यासाठी प्रशासनाने अधिक पारदर्शकता राखणं आवश्यक आहे. केंद्रावर शांतता आली असली तरी मनातील संभ्रम अजूनही हटलेला नाही. आणि मतदान संपेपर्यंत हा प्रश्न लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू राहणार, हे नक्की.


Leave a Comment

error: Content is protected !!