WhatsApp

“ठेवीदारांना फसवून गायब…!जास्त परताव्याचे आमिष ताकझुरे अर्थन निधी बँकेचा कोट्यवधींचा घोटाळा ”

Share

अकोला येथे ताकझुरे अर्थन निधी लिमिटेड बँकेवर शेकडो ठेवीदारांनी गंभीर आरोप केले आहेत. बँकेचे संस्थापक तुषार मनोहर ताकझुरे यांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा घेतल्या आणि काही काळ परतावा दिल्यानंतर अचानक पैसे देणे बंद केले, असा ठेवीदारांचा आरोप आहे.



रूपाली धम्मानंद सरदार, मीरा मधुकरराव ढंगेकर, पुनम विशाल शिरसाट, अंजली शेगावकर, प्रभंजनी अनिल बोगावकर, देविका चव्हाण, खुशी चव्हाण, अनुराधा विजय भागवत, निझ्या नवलखेडे, निलेश डिंगवर यांसह अनेक ठेवीदारांनी तक्रार दाखल करण्यासाठी एकत्र येत आपला अनुभव सांगितला.

तक्रारीनुसार, तुषार ताकझुरे यांनी “बँक सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे” असे सांगत आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन दिले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात NEFT द्वारे पैसे जमा करण्यास सांगून, नंतर ताकझुरे अर्बन निधी लिमिटेडच्या पासबुकमध्ये ती रक्कम डिपॉझिट दाखवण्यात आली. काही महिने परतावा दिल्यानंतर अचानक पैसे देणे थांबवण्यात आले.

ठेवीदारांनी विचारणा केल्यावर, दैनिक बचत खात्यात दररोज पैसे जमा करण्याचे बंधन लादण्यात आले. तरीही काही दिवसांनी परतावा पुन्हा बंद करण्यात आला. पैसे परत मागितल्यावर तुषार ताकझुरे यांनी “वेळ लागेल” असे सांगत वेळकाढूपणा केला.

Watch Ad

तक्रारदारांच्या मते, ठेवीदारांचा पैसा त्यांच्या परवानगीशिवाय शेअर मार्केटमधील TMT व्यवसायात वळवला गेला. SEBI कडून कोणताही परवाना नसताना हे गुंतवणूक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात तुषार ताकझुरे यांचा भाऊ पंकज ताकझुरे देखील बँकेत सक्रिय असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. त्याच्याकडून चौकशी झाल्यास अनेक बाबी उघडकीस येतील असा त्यांचा दावा आहे.

प्रमिलाताई ओक सभागृहात झालेल्या सभेत खुद्द तुषार ताकझुरे यांनी “ठेवीदारांची संख्या 1500 पेक्षा जास्त आहे” असे सांगितल्यामुळे घोटाळ्याचे प्रमाण कोट्यवधींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. पैसे परत देऊ न शकल्याने त्यांनी TMT ऑफिस, ताकझुरे अर्बन निधीचे कार्यालय आणि स्वतःचे निवासस्थान बंद केले आणि कुटुंबासह अकोला सोडून पलायन केले, असा ठेवीदारांचा आरोप आहे.

तक्रारदारांनी सांगितले की, तुषार ताकझुरे फोन घेणे बंद करून व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे मानसिक छळ करत आहेत. “तक्रार करू नका, नाहीतर पैसे मिळणार नाहीत” असा अप्रत्यक्ष दबाव ते टाकत असल्याचेही सांगितले.

ठेवीदारांनी पोलिसांकडे MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
“आमचे आयुष्यभराचे पैसे अडकले आहेत. मानसिक त्रास, अनिश्चितता आणि असुरक्षिततेने जगावे लागत आहे. पोलिसांनी तातडीने अटक करून आम्हाला न्याय द्यावा,” अशी ठेवीदारांची मागणी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!