अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | आषाढी वारीचा पवित्र सोहळा आज देहूपासून सुरू झाला. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करताना मोठ्या भक्तिभावात निघणार होती. मात्र यंदा इतिहासात प्रथमच पालखी निघण्याआधीच अनपेक्षित अडथळा निर्माण झाला.
देहूच्या मंदिरात पूजा सुरू असताना, तब्बल तीन तास पालखी रोखून ठेवण्यात आली. यामुळे आधीच निघालेल्या दिंड्या रस्त्यावर अडकून पडल्या आणि मोठ्या संख्येने वारकरी खोळंबून राहिले. गर्दी इतकी वाढली की मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यात दोन महिला जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
संपूर्ण प्रकारामुळे वारकरी वर्गात तीव्र नाराजीचा सूर पाहायला मिळाला. अनेकांनी हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे हा खोळंबा झाल्याचं स्पष्टपणे सांगितलं. मुख्यमंत्री पूजा पार पडेपर्यंत सुरक्षा कारणास्तव पालखी प्रस्थान रोखून धरण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे.
इतिहासात आजवर कधीही पालखी प्रस्थानाआधी दिंड्या थांबवल्या गेल्याचा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे यंदाची वारी सुरुवातीलाच वादग्रस्त ठरली आहे. काही वेळ वादंग आणि गोंधळानंतर शेवटी पूजा पार पडली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली.