WhatsApp


अकोल्याचा एक सुन्न शहर, एक हरवलेलं स्वप्न” कधी विचाराल, अकोलेकरांनो? तुम्हालाही काही हवंय की नाही?”अकोला शहराची एक हरवलेली कहाणी

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १६ एप्रिल २०२५ :- रात्र झाली होती. अंधाऱ्या आकाशात एकच चंद्र चमकत होता, पण अकोल्याच्या काळवंडलेल्या नशिबावर मात्र कुठलाही उजेड दिसत नव्हता. जुन्या टॉवरसमोर एक म्हातारा हातात काठी घेऊन एकटक पाहत उभा होता… त्याच्या डोळ्यांत केवळ आठवणी होत्या – ज्या काळी अकोला नाव घेताच मंत्रालयात वाऱ्याने दरवाजे उघडले जायचे. पण आज?

आज अकोल्याचं नाव उच्चारलं की मुंबईतल्या मंत्रालयात फक्त मौन पसरतो. एक नकोरे बाबा अशी अवस्था झाली आहे या एकेकाळच्या वैभवशाली जिल्ह्याची. अमरावतीत आज विमानतळाचं लोकार्पण झालं. भव्य सोहळा, उड्डाणाची स्वप्नं, विकासाचे वारे… पण अकोल्यात? इथे फक्त धूळ, आशांची राख, आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात रुजलेली उपेक्षा.

शिवानी येथे नागपूरनंतर अकोला हे विमानतळ उभारण्यात आलं होतं. अनेकांना वाटलं होतं – चला, आता अकोल्याचं भाग्य फळफळेल. पण तो दिवसही मावळला. विमानतळावर एकही विमान उतरलं नाही. धावपट्टीवर केवळ पक्ष्यांचे थवे फिरत राहिले, आणि लहानग्यांची स्वप्नं पुन्हा जमिनीवर आदळली.

याला जबाबदार कोण? राजकारण? की राजकारण्यांची उदासीनता? वर्षानुवर्षे सत्तेवर अधिष्ठान असलेल्या भारतीय जनता पार्टीने अकोल्याचं नशीब सावरायला हवं होतं. पण त्यांनी केवळ आश्वासनांची पताका फडकवली. काम मात्र अर्धवटच राहिलं.

आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत बोलताना म्हणाले, “येथील विमानतळावर लवकरच पायलट ट्रेनिंग स्कूलही सुरू होईल.” त्यांचं बोलणं जणू अकोल्याच्या जखमांवर मीठ चोळत होतं. अकोल्याचे खासदार आणि आमदार गप्पच राहिले. त्यांना या अनादराची जाणीवही झाली नाही.

वास्तविक, अकोल्याचं दुःख हे केवळ विमानतळापुरतं नाही. हे शहर दिवसागणिक खचतंय. इथं नळाला चार-पाच दिवसांनी एकदा पाणी येतं. रस्त्यावर दिवसा सुरू होणारे पथदिवे, रात्री मात्र झोपेत. सिग्नल बंद. उड्डाणपूल धोकादायक. कापूस गिरण्या भूतकाळात. बागा कोरड्या. रस्ते असे की गाडी सोडाच, पायी चालणंही अशक्य. नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याचा प्रवेश थेट पिण्याच्या पाण्यात.

असदगड किल्ला भग्नावस्थेत. मोर्णा नदीचं स्वच्छता आणि सौंदर्यीकरण हे केवळ फायलींत. अमृत भूमिगत सांडपाणी प्रकल्प – राखीव यादीत. आणि या सगळ्यावर पडदा टाकतो आपला एक गुण – “शांतपणा”.

अकोलेकरांनी इतका संयम दाखवला की आता तो मूर्खपणात मोडतो. प्रश्न विचारायची हिंमतही आता उरलेली नाही. आपण फक्त बघत राहतो… हातात मोबाईल, कानात हेडफोन, मनात उपेक्षा.

या अंधारात आशेचा एक किरण आहे का? होय. अमरावतीच्या राजकारणात सक्रिय असलेली एक महिला नेता – ती आपल्या शहराचा आवाज आहे. ती लढते. आवाज उठवते. पण अकोल्यात… इथे तर सत्तेचा खेळच अनंतकाळचा. आणि हा खेळ अकोल्याचं भविष्य गिळून टाकतोय.

आज या शहराला हाक द्यायची वेळ आली आहे – “अकोलेकरांनो, तुम्हालाही काही हवंय की नाही?”

कारण शहरं इमारतींनी नव्हे, तर नागरिकांच्या स्वप्नांनी जगतात. आणि अकोल्याचं स्वप्न अजूनही झोपेत आहे…

Leave a Comment

error: Content is protected !!